नाशिकरोड : मानव पुन्हा पुन्हा चुकतो, पापात पडतो. तरीही ईश्वराची मानवावरची माया आटत नाही. मानवाच्या तारणासाठी तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. ईश्वराचे प्रतिरूप असलेल्या मानवाने क्षमाशीलता, अहिंसा, बंधुभाव, प्रेम ही ईश्वरी मूल्ये आपल्या कृतीतून जपली पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक कॅथोलिक धर्म प्रांताचे महाधर्मगुरू बिशप लुडस डॅनियल यांनी केले.
नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभ संदेश देताना बिशप म्हणाले की, परस्पर सौहार्द जपूनही अन्यायाचा प्रतिकार करता येतो हे येशूने स्वदेहाची आहुती देऊन दाखवून दिले आहे. समस्त जगच आज कोरोनाच्या मगरमिठीत सापडले आहे. अशा परिस्थितीत अराजक निर्माण होऊ न देणे हे शासनकर्त्यांचे कर्तव्य आहे. तर घटनात्मक मार्गाने, आध्यात्मिक मूल्ये जपून तोल जाऊ न देता न्याय्य मागण्या पूर्ण करून घेणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. स्वतःवर करता तेवढं प्रेम शत्रूवरही करा, असा संदेश आपल्या कृतीतून देणा-या प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या सर्वधर्मीय बांधवांना प्रार्थनामय शुभेच्छा अशा शुभेच्छा बिशप यांनी दिल्या.