त्र्यंबकेश्वर : परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला. येथील श्री चंद्र भवन येथे श्रावण महिन्यानिमित्त कोलकाता येथील शिवसेवा संस्थानच्या वतीने आयोजित सामूहिक शिव महापुराण कथा सप्ताहात ते हितगुज करीत होते. कथेचे वाचक बालव्यास पं. श्रीकांतजी शर्मा असून, मुख्य यजमान राजेन्द्रप्रसाद अरविंद लाठी हे आहेत. आज मंगळवारी श्रीराम जन्म व हनुमान जन्माची कथा सांगण्यात आली. यावेळी स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, अनेक ऋषी-मुनींनी गोदावरी प्रगट करण्यासाठी प्रयत्न केले. पण गौतम ऋषींना भगवान विष्णूंनी गायीचे रूप धारण करून गोहत्या घडवून आणली. गौतम ऋषींकरवी आपल्या तपश्चर्येने गोदामाईला प्रगट व्हावे लागले असे हे ठिकाण आहे.भगवान त्र्यंबकेश्वराच्या तीन मुखांचे विश्लेषण त्यांनी समजावून सांगून काळा, गोरा व सावळ्या रंगाच्या गुणांबद्दल सविस्तर सांगितले. रज तम व सत्त्व गुणांची फोड करताना त्यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने प्रसंग समजावून सांगितले. यावेळी हनुमान जन्मस्थानाबद्दलही त्यांनी सांगून त्या ठिकाणी बाल हनुमान मातोश्रीच्या मांडीवर असल्याचे सांगून त्याठिकाणी दर्शन घेण्याचे आवाहन केले. मनापासून परमेश्वराचे स्मरण करा. त्याने ईश्वरभक्तीची प्राप्ती होते. या ठिकाणी नवनाथांची मुख्य अनुपान शिला असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण असल्याचेही स्वामी संविदानंद यांनी सांगितले. दरम्यान, बालव्यास वाचक पं. श्रीकांत शर्मा यांनी अर्धनारी नटेश्वर भगवान विष्णूचे मोहिनी रूप आदींबाबत वर्णन करूनसाक्षात भगवान शिवदेखील मोहित झाल्याचे सांगितले, तर गौतमांची कन्या अंजलीचीही कथा आपल्या रसाळ वाणीने ऐकविली. भाविक तल्लीन होऊन ऐकत होते. या कथेचा शिवकथेत उल्लेख आहे. शिवकथेचा समारोप येत्या गुरुवारी होणार आहे.
नामस्मरण केल्याने ईश्वरप्राप्ती : स्वामी संविदानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:14 PM