नाशिक : साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या ३९ समित्यांमध्ये अजून काही नाराजांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे समजल्यानंतर, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आयोजक लोकहितवादी मंडळाचे कान टोचले. या समित्यांमध्ये भारुडभरती करून केवळ समित्यांतील स्वयंसेवकांची यादी वाढविण्यापेक्षा आहे, त्या पदाधिकाऱ्यांनी कामाचा जोर वाढवून संमेलनाच्या तयारीला अजून वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.
साहित्य संमेलनासाठी केवळ ४ ते ५ हजार नागरिक येतील, असा प्राथमिक अंदाज बांधून त्याचे नियोजन आयोजक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. त्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या ३९ समित्यांमध्ये केवळ तीन व्यक्तींची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, हळूहळू काही कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवत, तर काहींनी नाराजी व्यक्त करीत आपापल्या आवडीच्या क्षेत्रात नावे समाविष्ट करण्याबाबतचा हट्ट धरला. त्या पार्श्वभूमीवर कुणालाही नाराज करायचे नाही, अशीच काहीशी भूमिका घेण्यात आल्याने, या समित्यांमधील सदस्यांची संख्या फेब्रुवारीच्या मध्यावरच ८५०च्या आसपास पोहोचलेली आहे.
इन्फो
त्यांच्या खर्चाचा भार कुणावर?
आताच ही संख्या ८५० वर गेली असून, त्यात अजून शे-दीडशे जणांची भरती केल्यास, ती संख्या १ हजारावर जाणार आहे, तसेच संमेलन काळात तर शालेय, महाविद्यालयीन एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शेकडो पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, यांच्याही भोजन, फराळाची व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे. त्या परिस्थितीत ही सर्व संख्याच दीड ते दोन हजारांच्या आसपास गेल्यास त्यांच्या खर्चाचा भुर्दंड विनाकारणच आयोजकांवर पडणार असल्याने तो खर्च कुणी उचलायचा, असा सवालही स्वागताध्यक्षांनी उपस्थित केला.
इन्फो
अन्यथा समितीतील सदस्यांकडून शुल्क
अनेक सदस्यांनी समित्यांमध्ये केवळ नावे नोंदवून घेण्यातच धन्यता मानलेली आहे. त्यातील अनेक जण अद्यापही संमेलन स्थळाकडे किंवा कोणत्याही मीटिंगला अद्याप एकदाही आलेले नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना सदस्यत्व का दिले, अशी विचारणाही त्यांनी केली. समित्यांमधील हे भरतीसत्र थांबवा, अन्यथा या समित्यांमधील सदस्यांकडूनही किमान हजार रुपये शुल्क आकारण्याचे निर्देशच स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी दिले आहेत.