नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, पहिल्या फेरीत आतापर्यंत ६१५ प्रवेश निश्चित झाले आहेत. या फेरीत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत (दि. २४) प्रवेश घेता येणार असून, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीईअंतर्गत पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये साडेसहा हजार जागांसाठी सुमारे साडेदहा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून, या अर्जांच्या आधारे प्राथमिक शिक्षण विभागाने पहिली सोडत काढली होती. या सोडतीमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांना आरटीईच्या पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली असून, १४ मार्चपासून विद्यार्थ्यांना जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ६१६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश घेण्याची संधी आहे. पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश मिळण्यास आलेल्या अडचणींविषयी प्राप्त तक्रारींवर निर्णय झाल्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांचा आढावा घेऊन शाळेपासून १ ते ३ किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.
आरटीईअंतर्गत ६१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:57 AM