नाशिक : मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विकास होणार आहे.सोमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक घेण्यात आली. यासंबंधी झालेल्या बैठकीत सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी अत्यावश्यक असणारी शिफारस तातडीने केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडोअर डेव्हलपमेंट कार्पोरेशन प्रकल्पासाठी नाशिक येथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून, या प्रकल्पामुळे नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील औद्योगिक वसाहतींच्या प्रगतीला हातभार लागेल त्याचबरोबर हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात नाशिक औद्योगिक वसाहतीची निवड केलेली असून, त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकास झपाट्याने होईल, असे गोडसे यांनी उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार देसाई यांनी उद्योग विभागाला तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. या बैठकीस औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अलगनबन, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, क्षेत्र व्यवस्थापक गजानन पाटील, उदय सांगळे आदी उपस्थित होते.
मुंबई-दिल्ली औद्योगिक प्रकल्पासाठी शिफारस : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:20 AM