नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी भारतीय जनता पार्टीचे डॉ. प्रशांत पाटील आणि तिसऱ्या आघाडीचे उमेदवार राजू देसले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेषत: भाजपाने अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यावेळी भाजपाचे अनेक नेते आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र अजून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. संक्रांत टाळून उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात असले तरी उमेदवारांकडून याचा इन्कार करण्यात आला. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख मंगळवार, दि. १७ अशी आहे. भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाने जोरसार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. नाशिकरोड शिखरेवाडी येथील मैदानातून त्यांच्या रॅलीस प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता शिखरेवाडीतून निघालेला मोर्चा तासभराने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दाखल होणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या आघाडीचे राजू देसले हे गेल्या शुक्रवारीच अर्ज दाखल करणार होते. परंतु दिल्लीहून ए.बी. अर्ज मिळण्यास विलंब झाल्याने ते आता सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्यासोबत जे. पी. गावित, राज्य सहसचिव सुभाष लांडे, स्मिता पानसरे, प्रा. के. एन. अहिरे, सुनील मालुसरे, अॅड. मनीष बस्ते तसेच कामगार संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर कॉँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाप्रमाणेच कॉँग्रेसकडूनही शक्तिप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
संक्रांत टळली, आता पदवीधरसाठी अर्ज
By admin | Published: January 16, 2017 1:40 AM