लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केंद्र सरकारकडे पैठणी क्लस्टरच्यासंबंधी तक्रार केल्यानंतर सरकारनेदेखील त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग मंत्रालयाला दिले असून, लवकरच या क्लस्टरची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले आमदार पंकज भुजबळ यांना आता पैठणी क्लस्टरच्या अध्यक्षपदावरून दूर व्हावे लागण्याची चिन्हे आहेत.येवल्याची पैठणी देशभरात प्रसिद्ध असून पैठणी उद्योगाला चालना मिळावी आणि सामायिक सुविधांचा सर्वांना लाभ मिळावा, यासाठी क्लस्टर स्थापन करण्यात आली. औद्योगिक समूह योजनेंतर्गत स्थापन या पैठणी क्लस्टर प्रकल्पासाठी एसपीव्ही म्हणजेच विशेष हेतू वहन संस्थेची स्थापना करण्यात आली असून, आमदार पंकज भुजबळ त्याचे अध्यक्ष आहेत. पंकज भुजबळ यांची ईडीमार्फत चौकशी सुरू असल्याने सध्या पैठणी क्लस्टरचे काम रखडले आहे. त्यामुळे पेशकार यांनी ७ एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या पोर्टलवर तक्रार केली. केंद्र शासनाचा यंत्रसामग्रीचा ९० टक्के निधी अशा एसपीव्हीकडे देणे योग्य होणार नसल्यामुळे संस्था किंवा अध्यक्ष यापैकी एकात बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या उद्योगाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. असे पेशकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले असून, पैठणी क्लस्टर आता त्वरित कार्यान्वित करावे, अशी मागणी पेशकार यांनी केली आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप तसेच पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी उपस्थित होते.
पैठणी क्लस्टरची लवकरच पुनर्रचना
By admin | Published: May 16, 2017 12:17 AM