नाशिक : जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेने ३२ लाखांचा टप्पा गाठताच एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा उच्चांकदेखील प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी (दि.१७) एकाच दिवशी ८२ हजार ४८१ इतके विक्रमी लसीकरण करण्यात आले. मागील आठवड्यात ७६ हजारांचा उच्चांक नोंदविण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील अनेक भागांत लसीकरणाची मोहीम सुरूच होती. त्यामुळे एका दिवसातील आकड्यात मोठी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला काहीशी अडखळत सुरूवात झाली. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या केंद्रांवर लांबच लांब रांगा लागत होत्या. लसीकरणसाठी काही लेाक तर पहाटे तीन वाजल्यापासूनच केंद्रांवर रांगा लावत होते. ज्यांचा दुसरा डोस होता त्यांना वेळेत लस मिळत नसल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. त्यामुळे त्यांनी वेळेत दुसरा डोस मिळावा यासाठी केंद्राबाहेर तळच ठोकला होता.
केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे याकाळात अनेक ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली तरीही गर्दी कमी होत नव्हती. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यासाठी हजारोंच्या संख्येने लसीचे डोस मिळू लागल्याने लसीकरण मोहिमेची गती वाढली. प्रतीक्षेत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. याच काळात दिवसेंदिवस लसीकरणाचा आकडा वाढत गेला. एकाच दिवसात ५५ हजारांपासून ६५ हजार ७२ हजार ७६ हजारांपर्यंत आकडा पोहोचला. १७ सप्टेंबरला त्यात आणखी वाढ होऊन ८२ हजारांच्या पुढे लसीकरण झाले. सायंकाळपर्यंत ८० हजार इतका लसीकरणाचा आकडा नोंदविला गेला. त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर संख्या ८२ हजारांच्या पुढे पोहोचली. त्यानंतरही लसीकरण सुरू होते तरीही ८२ हजार लसींचे डोस या मोहिमेतील एकाच दिवसातील लसीकरणाचा हा उच्चांक ठरला आहे.