लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली असलेल्या नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन पेठ, नांदगाव वगळता उर्वरित तेराही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात ९९५ मिलीमीटर इतका, तर जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत एकाच दिवसात ७२ टक्के पाऊस नोंदवून विक्रम केला आहे.
मान्सूनपूर्व निसर्ग चक्रीवादळाने सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात पावसाचा अंदाज कायम असल्याने लवकरच पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरपासूनच हवामानात कमालीचा बदल होऊन आकाशात ढगांनी गर्दी करून अधूनमधून हजेरी लावून मान्सूनपूर्व वातावरण निर्माण केले. मंगळवारपासून पावसाचा प्रभाव वाढला. वादळी वा-यासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली, त्यात बुधवारच्या चक्रीवादळाची भर पडली. दिवसभर कोसळलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत तर केलेच; परंतु अनेक भागांत मोठे नुकसानही केले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९९५.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याची वार्षिक सरासरी १५००४.६९ इतकी तर जून महिन्याची सरासरी २७०४.८० इतकी असून, एका दिवसातच पावसाने संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ७२.६१ टक्केपावसाचा विक्रम नोंदविला आहे.