त्र्यंबकेश्वर : तालुक्यात नव्यानेच कार्यान्वित केलेल्या प्राथमिक आरोग्य केन्द्र अंजनेरी येथे पहिल्यांदाच कार्यान्वित होताना सामना करावा लागला, तो कोरोनाचा ! येथे कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरद्वारे हजारो रुग्णांना जीवदान मिळून ते सुखरूप घरी गेले. तसेच सध्याच्या लसीकरणात देखील हे केंद्र मोलाची कामगिरी बजावत आहे.
यापूर्वी याच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेझे येथे एकाच दिवसात लसीकरणाचा उच्चांक नोंदवला होता, तर सोमवारी (दि. १६) या केंद्रांतर्गत असलेल्या आठ उपकेंद्रांतील मुख्यालयात लसीकरण करण्यात आले. यात कोविशिल्डचा पहिला डोस ३१८ पुरुष व २९० महिलांना देण्यात आला आहे. तसेच दुसरा डोस १४० पुरुष व १३६ महिलांना देण्यात आला. याव्यतिरिक्त ४२ गरोदर महिलांनी देखील लाभ घेतला. याचप्रमाणे एकाच दिवसात विक्रमी लसीकरण करण्यात आले. हे एकाच दिवसातील लसीकरण निश्चितच विक्रमी ठरावे.
या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कपिल आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. या कामासाठी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोतीलाल पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रत्यक्षात लसीकरण करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इंचार्ज वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा सोनवणे व डाॅ. आशिष सोनवणे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका आदींच्या प्रयत्नांमुळे दुसऱ्यांदा विक्रमी लसीकरणाचा मान मिळाल्याने नव्याने कार्यरत झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामगिरीचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.