निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण १६८० प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली. यातून ६ कोटी ८६ लाख ४२ हजार ३३७ रुपयांची वसुली झाली आहे. निफाड तालुका विधी व सेवा समितीचे अध्यक्ष तथा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनात एकूण सात समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज सुरू झाले. निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे, निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. जहागीरदार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाय. डी. बोरावके, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. बी. काळे, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. डब्ल्यू. उगले, निफाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एन. गोसावी या सात न्यायाधीशांचे अध्यक्षतेखाली पाच समित्यांद्वारे लोकन्यायालयाच्या कामकाजास सुरुवात झाली. या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ट ८४६ प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३१ प्रकरणांत यशस्वी तडजोडी झाल्या, तर न्यायालयात दाखल न झालेली अशी वादपूर्व
७४९९ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली होती. त्यापैकी १५४९ प्रकरणे तडजोडीत मिटली आहेत. अशा प्रकारे निफाडच्या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ट व वादपूर्व अशा नेमलेल्या एकूण ८३४५ प्रकरणांपैकी १६८० प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. त्यातून ६ कोटी ८६ लाख ४२ हजार ३३७ रुपयांची वसुली झाली आहे.