सिन्नर : दोन वर्षांपासून पाणीपट्टी थकविणाऱ्या नळधारकांवर वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाºया विरोधात पाथरे खुर्द ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा बडगा उगारला. पाथरे खुर्दच्या सरपंच कविता गुंजाळ, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, ग्रामसेवक नितीन मेहरखांब यांनी धडक वसुली मोहीम राबविली. थकीत पाणीपट्टी भरणा न करणाºया नळधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू झाल्यावर एकाच दिवसात ६५ टक्के थकबाकी वसूल झाल्याने मार्च अखेर ग्रामपंचायतीच्या तिजोरीत चांगलीच भर पडली.सिन्नर तालुक्यातील पाथरे गावासाठी वावीसह ११ गावे प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेत सहभागी गावांकडून देयके न मिळाल्याने अनेकदा योजनेचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणने केली होती. परिणामी योजना असूनही पाणी मिळत नाही अशी योजनेतील गावांची अवस्था व्हायची. गावपातळीवर ग्रामपंचायतीं- कडून नळधारकांकडून होणारी पाणीपट्टी वसुली जमा होत नसल्याने या परिस्थितीचा सामना करावा लागत होता. योजनेचे देयक वेळेत चुकते करून गावासाठी नियमित पाणीपुरवठा करता यावा यासाठी सरपंचपदाचा नुकताच कार्यभार स्वीकारणाºया कविता गुंजाळ, उपसरपंच सुकदेव गुंजाळ यांनी गेल्या २ वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टी वसुलीसाठी कठोर निर्णय घेत थेट पोलीस बंदोबस्तात वसुली मोहीम सुरू केली. मार्चअखेर १०० टक्के पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ग्रामपंचायत स्तरावर ठेवण्यात आले होते. मात्र, नळधारकांकडून काणा डोळा करण्यात येत होता. ग्रामविकास अधिकारी नितीन मेहेरखांब, सुभाष गुंजाळ यांनी नळधारकांच्या भेटी घेऊन थकबाकी जमा करण्याचे आवाहन केले होते.गावात दवंडी देण्यासह थकबाकीधारकांची नावे ग्रामपंचायत सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तरीही नळधारक प्रतिसाद देत नसल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च अखेरीस सरपंच गुंजाळ, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, सदस्य राजेंद्र सिनारे, गोरख पडवळ, जगन मोकळ, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांसह थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात करण्यात आली; मात्र नळधारकांनी विरोध केला. त्यामुळे दुसºया दिवशी पुन्हा पोलीस संरक्षणात नळ कनेक्शन तोडण्यात आले. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. बहुतांश नळधारकांनी उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित होण्याच्या भीतीने तत्काळ थकबाकी भरली तर काहींनी मुदतवाढ मागितली; मात्र थकबाकी भरल्याशिवाय संबंधितांचा पाणीपुरवठा सुरू न करण्याचा निर्णय सरपंच गुंजाळ यांनी घेतला.दर महिन्याला १३० रुपये वसुली करणारसरपंच गुंजाळ यांच्या धाडसी निर्णयामुळे सुमारे ६५ टक्के थकबाकी वसुली झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पाणीपट्टी वसुलीचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १३० रुपये पाणीपट्टी वसूल करणार आहेत. त्यामुळे थकबाकी वाढणार नाही व थोडे पैसे भरायला नळधारकांना सोईचे होईल असे ग्रामसेवक मेहेरखांब यांनी सांगितले.
सिन्नर येथे पोलीस बंदोबस्तात पाणीपट्टी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:43 PM