नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेत नियमांना फाटा देत करण्यात आलेल्या नोकरी भरतीतून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचा पदभार काढून माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे अधिकृतरित्या सोपविण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सहीने त्याबाबतचे अधिकृत आदेश निघालेले आहेत.
यासंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात प्रवीण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे वैद्यकीय उपचारांसाठी रजेचा अर्ज देत कारवाई टाळण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी पदभार काढून घेण्याची कारवाई ते टाळू शकलेले नाहीत. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित माध्यमिक शाळेमध्ये २२ शिक्षक, १२ शिपाई व ६ लिपिकांची २०२० मध्ये भरती करण्यात आली होती. ही नियुक्ती बेकायदेशीर असताना त्यांचे पगारही शासनाकडून काढण्यात आले असल्याची लेखी तक्रार पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती.
या तक्रारीच्या आधारे भरती प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी गुन्हा दाखल झाल्याची प्रत व इतर कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर या संबंधीचा अहवाल तयार करण्यात आला असून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दोन्ही प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडील चौकशीनुसार त्यात प्रवीण पाटील हे जबाबदार असून दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवाच्या नियमाचा भंग करणारे असल्याने गुन्ह्याचे स्वरुप आणि गांभिर्याचा विचार करुन पदभार हस्तांतरीत करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.