नाशिक : शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे निमित्त करून विनानिविदा जुन्याच ठेकेदारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याने घेतली आहे. कोरोनाचे संकट असल्याने सध्या प्रशासनाला व्यापक अधिकार प्राप्त आहेत. त्यातच कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने काही मोजके लोकप्रतिनिधी वगळता अन्य कोणीही खरेदी, निविदांच्या घोळात नाहीत. हीच संधी घेऊन आता वेगवेगळे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या सोमवारी झालेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आता रुग्णालय स्वच्छतेसाठी सफाई कामगार कमी पडत असून, तातडीने ३०० सफाई कामगार घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आता सध्या ठेकेदाराकडून ७०० कामगार आउटसोर्सिंगने घेण्यात आले. त्याच ठेकेदाराकडून आणखी ३०० कामगार घेऊन त्यांच्यामार्फत रुग्णालयांच्या सफाईचा घाट घातला जात आहे. मुळातच महापालिकेतील आऊटसोर्सिंगचा ठेका वादग्रस्त असून, मात्र, त्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून ३०० सफाई कामगार घेण्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.कंत्राटी पद्धतीने का नाही?महापालिकेत सध्या वैद्यकीय विभागासाठी डॉक्टर, नर्स, परिचारिका, आया, वॉर्डबॉय हे सर्वच तीन महिन्यांच्या कंत्राटावर घेतले जात आहेत. मग तीन महिने कालावधीसाठी याच पद्धतीने ३०० सफाई कामगारदेखील वॉक इन इंटरव्ह्यूतून घेता येऊ शकतात. तसेच तीन महिने कालावधीसाठी घेतल्यामुळे अन्य दायित्व महापालिकेवर राहणार नाही. असे असताना आता एकाच ठेकेदाराकडून भरतीचा अट्टाहास कशासाठी असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.
पुन्हा ३०० सफाई कामगार भरतीचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:21 AM
शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे.
ठळक मुद्देकोरोनाचे निमित्त : महापालिका विनानिविदा भरती करणार