नाशिक : राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध पदांची भरतीप्रक्रिया ही गत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडली असून यात प्रामुख्याने ग्रंथपाल पदांचाही समावेश आहे. आधी आरक्षण, निवडणूक आचारसंहिता व इतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रियेला विलंब झाला असून आता कोरोनामुळे महाविद्यालय ग्रंथपालांसह इतर पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, महाविद्यालयांतील हे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. सन २०१८ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ग्रंथपाल पदांच्या १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. मात्र, भरतीप्रक्रिया वारंवार स्थगित करण्यात आल्याने पात्रताधारक उच्चशिक्षित उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रंथपाल पदभरती प्रक्रिया बंद असल्याने ग्रंथालय शास्त्राचे उच्च शिक्षण घेऊनही पात्रता धारकांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली असून ग्रंथपाल पदांसाठी भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार असा सवाल पात्रता धारक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाविद्यालयांतील ग्रंथपालांची भरती प्रक्रिया बंद असताना शिक्षण संस्थांकडून ग्रंथालयांमध्ये मानधन तत्वावरही पात्रताधारक उमेदवारांच्या नियुक्त्या होत नसल्याने उच्च शिक्षण घेऊन बसलेले पात्रताधारक हवालदिल झाले असून ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.