नाशिक : राज्यभरातील विविध परीक्षांमध्ये सातत्याने सुरु असलेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांचे कुलपती असलेले राज्यपाल रमेश बैस किती सजग आहेत, त्याचाच प्रत्यय त्यांनी गुरुवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बैठकीतील मार्गदर्शनातून दिला. विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा अत्यंत महत्वाचा आणि गोपनीय विभाग असल्याने या विभागात केवळ कायम कर्मचारीच नेमावेत, असा सल्ला राज्यपाल बैस यांनी दिला.
नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान व वैद्यकीयविषयक विद्यापीठ आहे. पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत राज्यातील सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांचा अंतर्भाव आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फतच घेतल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल बैस यांचे विधान हा राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा विभागांसाठी मार्गदर्शक असाच असल्याचे अधोरेखित झाले.