नाशिकरोड : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहायक पदाच्या भरतीसाठी शिकाऊ प्रशिक्षणाची सक्तीची केली अट महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे रद्दबातल ठरविण्यात आली आहे. यामुळे खातेनिहाय उमेदवारांना याचा लाभ होणार आहे.महावितरण कंपनीने जुलै २०१६ मध्ये उपकेंद्र सहायक २२५० पदाच्या जागाकरिता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आय.टी.आय. सोबत शिकाऊ प्रशिक्षणाची अट सक्तीची केली होती. मात्र त्यापूर्वी महावितरण कंपनीने अनुकंपाच्या उमेदवारांना आय.टी.आय. करून घेऊन त्यांना विद्युत सहायक म्हणून व अन्य उमेदवारांना आय.टी.आय.च्या धर्तीवर कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नियुक्त्या दिल्या होत्या. या उमेदवारांना ४-५ वर्षांचा अनुभव होऊनही उपकेंद्र सहायक पदाकरिता आय.टी.आय. सोबत शिकाऊ प्रशिक्षणाची अट सक्तीची असल्यामुळे खातेनिहाय अर्ज करता आले नव्हते. याबाबत महाराष्ट्र वीज कामगार सेनेने आक्षेप घेत जे कामगार ४-५ वर्षांपासून महावितरण कंपनीत कार्यरत आहे त्यांना शिकाऊ प्रशिक्षणाची अट सक्तीचे करणे चुकीचे आहे, अशी भूमिका घेतली होती. याबाबत १० आॅगस्ट २०१६ रोजी मनसे वीज कामगार सेनेचे कार्याध्यक्ष राकेश जाधव, सरचिटणीस संतोष विश्वेकर, उपाध्यक्ष रामनाथ साबळे, जगन्नाथ कदम, मदन खोत, गिरीश जगताप, सर्जेराव वाघमारे, धीरज रोकडे यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देऊन शिकाऊ प्रशिक्षणाची अट शिथील करावी, अशी मागणी केली होती. (प्रतिनिधी)
उपकेंद्र सहायक पदाची भरतीप्रक्रिया अखेर झाली रद्द
By admin | Published: January 23, 2017 11:09 PM