नाशिक : महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीला पुन्हा खोळंबा निर्माण झाला असून, आवश्यक ती पात्रता नसलेल्या सदस्यांच्या नियुक्तीस अन्य सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने महापालिकेला वृक्षप्राधिकरण समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून समितीवर पात्रता असलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा घोळ सुरू आहे. महापालिकेने तीन वेळा जाहिरात देऊनही पात्र सदस्य उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महापालिकेने चौथ्यांदा जाहिरात दिल्यानंतर चार सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे, परंतु प्रस्ताव विषयपत्रिकेवर येण्यापूर्वीच शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत अन्य सदस्यांनी संबंधित अर्जदारांची शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांच्या नियुक्तीस विरोध दर्शविला. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी वृक्षसंरक्षक जाळ्यांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीला आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह संजय चव्हाण, प्रा. कुणाल वाघ, प्रा. परशराम वाघेरे, संजय साबळे, डॉ. विशाल घोलप आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वृक्षप्राधिकरणावरील नियुक्तीस खोळंबा
By admin | Published: August 21, 2016 1:44 AM