लासलगाव : येथील बाजार समितीत लाल कांद्याने दहा हजारांचा टप्पा पार केला. या हंगामातील हा सर्वाधिक भाव ठरला. लाल कांद्याची ३२७४ क्ंिवटल आवक झाली. कमीत कमी २५०० तर जास्तीत जास्त दहा हजार तर सरासरी ७५०० रूपये भाव मिळाला. उन्हाळ कांदा जवळपास संपत आल्याने आता लाल कांदा बाजारात भाव खातांना दिसत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा संपला असून, सद्यस्थितीत या कांद्याची नगण्य आवक होत आहे, तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन लाल कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे ऐन कांदा लागवडीच्या वेळी जोरदार पावसामुळे खराब झाल्याने लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला. या परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून रोपे वाचविली होती. या काहीअंशी शिल्लक असलेल्या रोपांवर कांदा लागवड झाली असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने लावलेले कांदेही जास्त पावसामुळे खराब झाले आहेत.शिवाय गेल्या एक ते दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण व धुक्यामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण नसल्याने सद्यस्थितीत लाल कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. परिणामी कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लाल कांदा दहा हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 1:10 PM