नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले. नाशिकहून निघालेले हे लाल वादळ विल्होळी येथे दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर जिल्ह्णाचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आंबे बहुला गावाजवळील एका खासगी आस्थापनेच्या कक्षात किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर बव्हंशी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर, किसान सभेने लॉँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला.महाराष्टÑ राज्य किसान सभेच्या वतीने दि. ६ ते १२ मार्च २०१८ या कालावधीत नाशिक ते मुंबई विधानभवनावर पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, वर्ष उलटूनही शासनाने बव्हंशी मागण्यांची पूर्तता न केल्याने शेतकरी, आदिवासींचे हे लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने घोंगावले. आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये राज्यभरातील हजारो शेतकरी, आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. बुधवारी(दि.२०) दिवसभरातच हजारो शेतकरी, आदिवासी बांधव नाशिकमध्ये मुक्कामी आले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्टÑीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे.पी. गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा झाली. परंतु अपेक्षित असा तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे नियोजनाप्रमाणे गुरुवारी (दि. २१) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास लॉँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केले. काही वाहने पुढे गेल्यानंतर पाठीमागून हाती लाल झेंडे घेतलेले हजारो शेतकरी आदिवासी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाले. या लॉँग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी शेतकरी-आदिवासींमुळे महामार्ग लाल रंगाने काठोकाठ न्हाऊन निघाला होता. शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया या लॉँग मार्चमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचाही सामना स्थानिक नागरिकांना करावा लागला. घोषणाबाजी करत निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये आदिवासी नृत्यासह विविध लोककलेचेही दर्शन घडविले जात होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असा ठाम भाव प्रत्येक आंदोलकांच्या चेहºयावर झळकत होता. आता मागे फिरायचे नाही, असा निर्धार करत निघालेला हा लॉँग मार्च दुपारच्या सुमारास भोजनासाठी विल्होळीपुढील आंबेबहुला गावाजवळील एका मैदानात विसावला. याच आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव यांनीही सहभागी होत आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, या लॉँग मार्चच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.गिरीश महाजन, जयकुमार रावल चर्चेत सहभागीविल्होळी पुढे असलेल्या आंबेबहुला गावाजवळ लॉँग मार्च दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्यासह नितीन भोसले सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवंींद्रकुमार सिंगल, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी अधिकारीवर्गही उपस्थित होता. याशिवाय बैठकीच्या वेळी भाजपाचे नाशिकमधील तीनही आमदार व काही पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चेकºयांनी आपल्या विविध मागण्या मंत्रिमहोदयांसमोर ठेवल्या. अखेरीस मुख्यमंत्र्यांशीही झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने घेण्यात आला.विविध मागण्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यात प्रामुख्याने, पश्चिम वाहिन्यांचे पाणी महाराष्टÑासाठीच वापरण्याचे आश्वासित करण्यात आले आहे. याशिवाय, दर दोन महिन्यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल.- गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक
लाल वादळ शमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:36 AM
नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले.
ठळक मुद्देलॉँग मार्च स्थगित : मुख्यमंत्र्यांशी चर्चा; नाशिकच्या वेशीवरच शिष्टाई सफल