नाशिक : गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना यंदा किमान रेडीरेकनरच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा शहरातील जमिनींच्या सरकारी बाजारमूल्यात फारशी वाढ नसल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने जमिनीचे सरकारी बाजारमूल्य घोषित करण्याचे वेळापत्रक बदलले असून आता दर नवीन आर्थिक वर्षांपासून दर ठरणार आहेत. त्यानुसार येत्या १ तारखेपासून दर घोषित करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत येत असल्याने सरकार बाजारमूल्यात फार वाढ करू नये, अशी मागणी होत होती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची हीच मागणी लक्षात घेता अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यंदा वाढ नको, अशी मागणी केली आहे. पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही हीच मागणी जोर धरू लागली आहे. तथापि, दर एकसारखे ठेवण्याची मागणी शक्य नसली तरी शहरात सरासरी पाच ते दहा टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
रेडीरेकनर : शहरातील दरात माफक वाढ शक्य
By admin | Published: March 20, 2017 12:11 AM