सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांदा दाखल झाला तरी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करतात. साठवलेला कांदा अजूनही विक्रीसाठी आणला जात आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. उन्हाळ कांदाच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. कमी दराने व्यापारी कांदा खरेदी करतात. कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा साठवणूक आणि इतर खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. परिणामी खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. बियाणे, रोपे तयार करणे शेतीची मशागत करणे, खते देणे, औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. शिवाय शेतकऱ्यांना चार महिने पाणी द्यावे लागते. इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल दराने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
कोट....
कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधने यामुळे कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत असतो. व्यापारी वर्गाच्या विक्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर त्यात चार पैसे व्यापाऱ्यालासुद्धा मिळतात; पण वेगवेगळ्या कारणांमुळे बाजारभाव पडतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापारी या दोघांना बसतो.
- अनंत भुतडा,
कांदा व्यापारी, सायखेडा
कोट....
ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रुपये दर मिळूनदेखील कांदा परवडत नाही. किमान तीन हजार रुपये दर मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहतील. मात्र अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात चढउतार होत आहे. आता तर लाल कांदा आल्याने उन्हाळ कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवत आहे.
- उत्तम हाडपे, शेतकरी, म्हाळसाकोरे
फोटो- ०५ सायखेडा बाजार
सायखेडा बाजार समितीच्या आवारात झालेली कांदा आवक.