पंचवटी : दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडवा (बलिप्रतिपदा) सणानिमित्त पंचवटीत पारंपरिक पद्धतीने सायंकाळी ‘रेड्यांची’ सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वीरशैव लिंगायत गवळी समाज तसेच परिसरातील दुग्ध व्यावसायिकांनी पाडव्यानिमित्त रेड्यांच्या शिंगावर तसेच अंगावर रंगरंगोटी करून गळ्यात पितळी घंटा, तोडे तसेच झेंडूच्या फुलांच्या माळा, अशी आकर्षक सजावट केली होती, तर काहींनी रेड्यांच्या पाठीवर विविध देवदेवता, राजकीय पक्षाचे चिन्ह काढले होते. काही रेड्यांच्या पाठीवर सध्याच्या धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन ‘धरण वाचवा- पाणी वाचवा’ असे संदेश लिहिलेले होते. तर काही रेड्यांच्या पाठीवर ‘लेक वाचवा-देश वाचवा’ असे संदेश होते. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली रेड्यांची मिरवणूक पुढे दिंडोरीरोड, पंचवटी कारंजा तसेच गंगाघाट परिसरात असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिराकडे नेण्यात आली. म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनानंतर मिरवणुकीतील रेडे एकमेकांच्या समोरासमोर उभे करण्यात येत होते. या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिक शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे पाडव्यानिमित्त रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, अनिल कोठुळे, महेश कल्याणकर, भास्कर शिंदे, महेंद्र आव्हाड, मंगेश कोठुळे, गणेश कल्याणकर, चंद्रकांत कोठुळे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. (वार्ताहर)
पाडव्यानिमित्त ‘रेड्यांची’ मिरवणूक
By admin | Published: November 14, 2015 11:55 PM