नाशिक : केंद्र शासनाकडून सादर झालेला अर्थसंकल्प कृषिपूरक, आरोग्य क्षेत्राला बळ देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे प्रतिपादन खासदार भारती पवार यांनी केले. सध्या पेट्रोलचे दर वाढत असले तरी राज्य सरकारने आपले कर कमी करावेत त्यामुळे दर नियंत्रित होऊ शकतात, असेही पवार म्हणाल्या.
खासदार पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था सुधारणे, कोविड सुरक्षा, आरोग्यव्यवस्था, सुदृढ कृषी व्यवस्था, पायाभूत सुविधा, गरीबकल्याण, डिजिटल यावर भर देण्यात आल्याचे सांगितले. देशासाठी कृषी धोरणावर १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नाशिक शहराच्या निओ मेट्रोसाठी २०९२ कोटी रुपये केंद्र शासन देणार असून, त्यामुळे नाशिकमधील वाहतुकीचा जटिल प्रश्न मार्गी लागू शकणार असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. उज्ज्वला योजनेचा लाभदेखील देशभरातील आठ कोटी महिलांना मिळाला असून, नवीन टप्प्यात पुन्हा एक कोटी महिलांना तो मिळेल, अशी तजवीज करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले. पेट्रोल दरवाढीबाबत राज्याने प्रथम त्यांचा कर कमी करून दर कमी केल्यास आपणदेखील केंद्राकडे पाठपुरावा करू, असेही भारती पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, पवन भगूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.