नाशिक : महापालिका प्रशासनाने दि. २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, परंतु त्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्भवत असल्याने प्रशासनाने आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यासंबंधी फेरविचार सुरू केला आहे. याबाबत मंगळवारी महापौरांकडे झालेल्या बैठकीत प्रशासनाने निर्णय घेण्याची विनंती केली असता पदाधिकाऱ्यांनी विशेष महासभेत प्रशासनाकडूनच प्रस्ताव ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (दि.५) विशेष महासभा बोलाविण्याचे आदेश महापौरांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत.गंगापूर धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने दि. २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली परंतु त्यात अनेक अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागतो आहे. काही भागांत नवीन आणि जुन्या पाइपलाइन असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना तारांबळ उडत आहे. त्यातच महापालिकेला प्रतिदिन ३२० ते ३३० दशलक्ष लिटर्स पाणी उचलावे लागत आहे, परंतु पुरेशा दाबाने पाणीपुरवठा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीत वाढ झालेली आहे. त्यातच महापालिकेने शिवाजीनगर आणि बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रामार्फत दर सोमवारी सिडको व पूर्व भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यातही तांत्रिक अडचणींमुळे आता सदर परिसरात सोमवारऐवजी मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
पाणीकपातीचा होणार फेरविचार
By admin | Published: March 02, 2016 12:18 AM