कळवण : नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी व शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विकास सहकारी संस्थेच्या सभासदांनी जिल्हा बँक मजबूत होण्यासाठी व गावपातळीवरील विकास संस्था सक्षम होण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी कळवण येथे केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाढता एनपीए नियंत्रित ठेवण्यासाठी कर्जवसुली मोहीम हाती घेतली असून, यासाठी बँकेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या असून, वसुलीचा आलेख उंचावण्यासाठी या बैठकीचा शुभारंभ कळवणपासून करण्यात आला.यावेळी दराडे म्हणाले, कोणतेही सरकार आले तरी कर्जमाफी होऊ शकणार नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढवून घेण्यापेक्षा थकबाकीची रक्कम भरणा करून आपल्या गावातील हक्काची संस्था व जिल्हा बँक अधिक कार्यक्षम होण्यासाठी थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बँकेचे संचालक व कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन धनंजय पवार यांनी कसमादे भागाचे सहकार क्षेत्रातील डबघाईस गेलेला वसाका सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाने अर्थपुरवठा करून या भागातील शेतकरी, कामगार यांचे हित जोपासण्याचे काम केले त्याबद्दल आभार व्यक्त करून वसाकाला ऊसपुरवठा करावा, असे आवाहन केले. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक सुभाष देसले यांनी बँकेच्या एकूण कामकाजाचा आढावा घेऊन ९०० कोटी रुपयांचे थकबाकी कर्ज भरण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक बँकेचे विभागीय अधिकारी आर. व्ही. पवार यांनी केले.
कर्जवसुलीसाठी कळवणला चिंतन बैठक
By admin | Published: December 16, 2015 11:07 PM