दुचाकीने प्रवास करत असताना सोमवारी संध्याकाळी द्वारकेजवळ उड्डाणपुलावर नायलॉन मांजाने गळा चिरला जाऊन दुचाकीस्वार महिला भारती मारुती जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नायलॉन मांजाची विक्री प्रशासनाने तत्काळ थांबवावी आणि मयत जाधव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२९) जिल्हा शासकीय रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्त्यांसह त्यांच्या नातेवाईक व परिसरातील रहिवाशांनी आंदोलन केले.
खासगी कंपनीतून सुटी झाल्यानंतर घरी परतणाऱ्या भारती यांच्या गळ्याला नायलॉन मांजाचा फास बसला आणि त्या दुचाकीवरून उड्डाणपुलावर कोसळल्या. फास इतका भीषण होता की त्यांचा गळा मोठ्या प्रमाणात चिरला गेला. परिणामी, त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, सहा वर्षीय मुलगा, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, जाधव यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत प्रशासनाकडून द्यावी आणि शहरातील नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांसह साठा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई जिल्हा व पोलीस प्रशासनाने करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मयत जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेत आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला. यावेळी नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासह भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी धाव घेत आंदोलकांची समजूत काढत नायलॉन मांजा विक्री थांबविण्यात येईल आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दौंडे व सोनवणे यांनी दिले. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आंदोलन मागे घेतले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पंचवटी अमरधाममध्ये जाधव यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
--
फोटो क्रमांक- २९पीएचडीसी७४/७५/७६