नाशिक : आत्महत्त्या केलेले निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या जळगावमधील कार्यकाळाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़ या विभागीय चौकशीचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले़पोलीस निरीक्षक अशोक सादरे हे जळगावमध्ये कार्यरत असताना तीन वेळा त्यांना निलंबित करण्यात आले होते़ (पान ९ वर)ज्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले त्या अधिकाऱ्यांनी निलंबनाची दिलेली कारणे, त्या प्रकरणांचे सर्व दस्तावेज मागविण्यात आले आहेत़ या दस्तावेजांचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करून पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे सिंह म्हणाले.निरीक्षक सादरे यांच्यावर जळगाव येथील खंडणीचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये भारतीय दंड विधानातील अनेक कलमांचा समावेश आहे़ नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात सादरे यांच्या पत्नीने जळगावचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़जालींदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ त्याचा तपास नाशिक पोलीस करीत आहेत़ माझ्याकडे केवळ विभागीय चौकशीचे काम असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले़दरम्यान, सादरे आत्महत्त्याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि़१८) सादरे कुटुंबीयांच्या घरी जाऊन तपासी अधिकाऱ्यांनी जबाब घेतले़ (प्रतिनिधी)
सादरेंच्या कार्यकाळाची विभागीय चौकशी : सिंह
By admin | Published: October 19, 2015 11:44 PM