नाशिक : ‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहने यामुळे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधिरपणाला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस आयुक्तालयानंतर प्रादेशिक परिवहन विभागानेही जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला सोमवारी परिवहन कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाने उपस्थित टॅक्सीचालक, रिक्षाचालकांना ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा प्रचार-प्रसार करणाºया कॅप दिल्या. तसेच वाहनांच्या दर्शनी भागावर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ असे शाब्दिक आवाहन असलेले स्टिकर लावण्यात आले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह आदि अधिकारी व टॅक्सी, वाहतूक, स्कूल बसचालक रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यांवर कमाल वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर एवढी असावी, तसेच रस्त्यांवरून वाहतूक करताना हॉर्नचा अनावश्यकरिता केला जाणारा वापर टाळावा या दोन निकषांवर आधारित परिवहन विभागाने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी होणाºया वाहनचालकांकडून विहित नमुना अर्ज भरून घेण्यात आला.अशी पार पडली स्पर्धाया स्पर्धेत सुमारे तीस वाहनचालक सहभागी झाले होते दुचाकी-चारचाकी वाहनचालकांसाठी असलेल्या या स्पर्धेचा मार्ग पेठ फाटा (भक्तिधाम) डावीकडे वळण घेत निमाणीस्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार, शरणपूररोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाकामार्गे पेठ फाट्यावरील परिवहन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला. या मार्गावर सहभागी स्पर्धक वाहनचालकांवर पर्यवेक्षकांनी नियंत्रण ठेवत अर्जावर विहित नमुन्यात नोंदी नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मी.ची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:07 AM