नाशिक : राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्रांची माहिती सादर करणार नाहीत, अशी महाविद्यालये व संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत. राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित, महापालिका, अल्पसंख्याक, आरोग्य विज्ञान, तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण, कलाशिक्षण, पशू व मत्स्य विज्ञान शिक्षण या कार्यक्रमांच्या महाविद्यालयांना व संस्थांना प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव तथा राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षाचे आयुक्त ए. ए. रायते व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे अशा सर्व महाविद्यालये व संस्थांना २२ एप्रिल ते २२ मे या कालावधीत महाविद्यालय व अभ्यासक्रमांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण करून (परिशिष्ट-अ) आवश्यक ते कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक असून, जी महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्र माहिती सादर करणार नाही, अशी महाविद्यालये व संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत. खासगी-विनाअनुदानितसाठी परिशिष्ट-बराज्यातील खासगी अथवा विनाअनुदानित महाविद्यालयांनाही २२ मे पर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार असून, या महाविद्यालयांना ‘परिशिष्ट-ब’नुसार आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार असल्याची सूचनाही प्रवेश नियामक प्राधिकरण सचिव रायते यांनी केली आहे. महाविद्यालये व संस्थांना नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक परिशिष्ट-अ व परिशिष्ट प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाकरीता संस्थांना २२ मे पर्यंत नोंदणीची मूदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 2:57 PM