शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेचे नियमित कामकाज सुरू होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात उपरोक्त सूचना केल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची आगावू नोंदणी करण्यात यावे व ही माहिती अद्ययावत असावी अशा सूचना देण्यात आल्या. त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाणातील अतिक्रमित बांधकामे नियमित करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून ते ऑनलाईन भरण्यात यावे. अशा अतिक्रमित बांधकामांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे असेही सांगण्यात आले. गावाची हद्द व प्रत्येक मिळकतीची मोजणी करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या स्वामित्व योजनेंतर्गंत ड्रोनद्वारे मोजणी सुरू झाली असून, गट विकास अधिकाऱ्यांनी गाव नमुना ८ प्रमाणे माहितीचा डाटा तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांचीही आढावा बैठक घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने सन २०-२१ आर्थिक वर्षातील खर्च व २०२१-२२ च्या आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली तसेच जिल्हा नियोजन समितीने वाढीव निधी देण्याची तयारी दर्शविल्याने त्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या.