सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व वरील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित व्यवसाय करत असल्याच्या पुराव्यासह नगर परिषद कार्यालयात नावनोंदणी करावी व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.
नगर परिषदेद्वारे केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी करण्याचे कार्य चालू आहे. शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलन करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अभियानाच्या माध्यमातून शहरी गरीब व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता विविध घटकांद्वारे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर या माहितीचे संकलन केले जात आहे.
जोखमीचे किंवा धोकादायक क्षेत्रामध्ये कामा करणाऱ्या कुटुंबाची, व्यक्तींची यादी कामगार आयुक्त कार्यालय, हमाल पंचायत, स्वच्छता कामगार संघटना, सामाजिक संघटना, कचरावेचक कामगार संघटना किंवा संस्था यांच्याकडून उपलब्ध करून घेण्याचे कार्य नगर परिषद स्तरावर तयार करण्यात येत आहे.
५० बचतगटांना बँकेच्या माध्यमातून वार्षिक ४ टक्के व्याजदराने जवळपास ४६ लाख रु पयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभियानांतर्गत महिलांना गट संकल्पना, नेतृत्व विकास व बदल तसेच आर्थिक साक्षरतेबाबत प्रशिक्षण देणे, बँकेचे व्यवहार, विमा याबाबत माहिती दिली जात आहे. अभियानाचे कार्य यापुढे चालू राहणार आहे. शहरी भागातील जोखमीचे किंवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांचे बचतगट तयार करून त्यांनादेखील वरीलप्रमाणे लाभ उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी दिली.
--------
२१.९० लाखांचा फिरता निधी वितरित
सामाजिक अभिसरण व संस्थात्मकबांधणी या घटकाच्या माध्यमातून शहरी गरीब महिलांचे बचतगट तयार करून या बचतगट वस्तीस्तरीय संघास जोडणे व वस्तीस्तरीय संघ हे शहरस्तरीय संघास एकत्र जोडले जात आहेत. डिसेंबरअखेर २२८ बचतगट स्थापन करण्यात आले असून, ११ वस्तीस्तरीय संघ व १ शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. जवळपास २५१८ महिलांचे संघटन झाले आहे. २१९ प्रत्येकी १० हजार याप्रमाणे २१ लाख ९० हजार रुपयांचा फिरता निधी अभियानांतर्गत वितरित करण्यात आला आहे.