नाशिक : राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला अवघा अठवडाभराचा कालावधी उरल्याने उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे, सध्या दररोज साडेतीनशे ते चारशे व्यवहारांची नोंद होत असून अनेक ग्राहक मोठे आर्थिक व्यवहार असल्याने तत्काळ नोंदणीला प्राधान्य देत आहेत, तर ज्यांना नोंदणी शुल्क नियमांची माहिती आहे. ते सध्या शुल्क भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्तनाेंदणीचे प्रमाण वाढले असून, मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता यावा, यासाठी राज्यातील काही शहरात विशिष्ट दुय्यम निबंधक कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. नाशिकमध्येही काही कार्यालये रात्री ८ पर्यंत सुरू राहत आहेत. सध्या जिल्ह्यातील सात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दररोज प्रत्येकी ५० ते ७५ प्रकरणांची नोंद होत असून, दिवसाला जवळपास साडेतीनशे ते चारशे दस्तनोंदणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून डिसेंबर महिन्याच्या पूर्वार्धात तब्बल २९ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यानुसार दिवसाला जवळपास एक कोटी ९० लाख ते दोन कोटींपर्यंतचा महसूल शासनाला मिळत असून, आता अखेरच्या आठवड्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घर खरेदीला चालना मिळाली असून, नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिमाहीमध्ये ३७ हजार ४२२ दस्तनोंदणीच्या माध्यमातून शासनाला १७७ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी २९.७७ कोटींची भर पडली आहे.
इन्फो-
मुद्रांक शुल्क कपातीनंतर दस्तनोंदणी
महिना -दस्तनोंद - महसूल ( रुपयांमध्ये )
सप्टेंबर -११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख
ऑक्टोबर - १३,३७२ - ६८ कोटी २१ लाख
नोव्हेंबर - १२,५७८ - ५५ कोटी ७० लाख
१५ डिसेंबरपर्यंत -४४७५ - २९ कोटी ७७ लाख