नाशिक : कुटुंबाबाहेरील ब्रेनडेड व्यक्तीची किडनी एखाद्या किडनी रुग्णाला आवश्यक असते, अशा प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णाची नाव नोंदणी झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटीकडे (झेडटीसीसी) करणे बंधनकारक असते; मात्र अनेक किडनीरुग्ण, कुटुंबीय आणि नातेवाइकांमध्ये या माहितीचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक किडनी रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरलेला असतो. अशा परिस्थितीत एकतर कुटुंबातील व्यक्ती किंवा कुटुंबाबाहेरील कुणी अज्ञात ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीची किडनी हेच पर्याय असतात. कुटुंबातील व्यक्तीची किडनी असल्यास ज्या रुग्णालयात हे ट्रान्सप्लांट करायचे असते, तेथील एथिक्स कमिटी दोघांचेही सर्व डिटेल्स घेऊन त्यांची वैद्यकीय माहिती तपासून घेते. त्याशिवाय शासनाच्या ट्रान्सप्लांट कमिटीकडे किडनीदाता आणि रुग्ण अशा दोघांची मुलाखत घेऊन त्यानंतरच कुटुंबातील व्यक्तीची किडनी देण्यास परवानगी अथवा न देण्याचा निर्णय या समितीकडून घेतला जातो. नाशिक जिल्ह्यासाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयात ही वैद्यकीय समिती निर्धारित करण्यात आली असून, या समितीच्या परवानगीनंतरच ऑपरेशनचा निर्णय होऊ शकतो; मात्र, ज्या रुग्णांना कुटुंबातील कुणाचीही किडनी चालणार नसते, किंवा कुटुंबातील अन्य कुणी त्यासाठी तयार नसते, अशावेळी ब्रेनडेड रुग्णाची किडनी मिळेपर्यंत वाट पहावी लागते; मात्र त्यासाठीदेखील झेडटीसीसी समितीकडे आधी नाव नोंदणी आवश्यक असते. महाराष्ट्रात केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार ठिकाणीच ही झेडटीसीसी नाव नोंदणीची व्यवस्था आहे. त्या विभागातील अन्य जिल्हे या चार जिल्ह्यांना जोडण्यात आले आहेत. त्यात नाशिक हे पुणे जिल्ह्याला जोडलेले आहे. अवयवदान प्रत्यारोपणाचा कायदा १९९५ मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर किडनी, लिव्हरसह अन्य अवयवांचे दान करण्यास सुरुवात झाली; मात्र याबाबत अजूनही फारशी जनजागृती झालेली नाही. झेडटीसीसी कशा पद्धतीने कामकाज करते, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, याबाबत सर्वसामान्यांना माहितीच नसल्याने अनेकांना अवयवाची गरज असूनही वंचित रहावे लागत आहे.
इन्फो
प्रतीक्षा यादीनुसार उपलब्धता
झेडटीसीसीने रिट्राइव्हल सेंटर म्हणून मान्यता दिलेल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्येच हे अर्ज उपलब्ध केले आहेत. किडनीची गरज आहे, याची नोंद करून हे फॉर्म तेथेच जमा केल्यानंतर रिट्राइव्हल सेंटरकडून पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील झेडटीसीसीकडे हा फॉर्म पाठविला जातो. झेडटीसीसी अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करते, तसेच संबंधिताच्या प्रतीक्षा यादीनुसार त्याच्यासाठी किडनी उपलब्ध होईल, त्या पद्धतीने यादीनुसार गरजूंना किडनी किंवा अन्य अपेक्षित अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते.
इन्फो
माहिती दिली जाते
झेडटीसीसीबाबत फारच कमी रुग्णांना आणि कुटुंबीयांना माहिती असते; मात्र ज्या रुग्णांना तशी नोंदणी आवश्यक असते, त्यांना किंवा कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती संबंधित हॉस्पिटलकडून दिली जाते.
डॉ. देवदत्त चाफेकर, किडनी विकार तज्ज्ञ.