मातोरी : आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. पुराचा नेहमीच या भागाला फटका बसत असल्याने गावातील कोळीवाडा व इतर परिसरातील रहिवाशांना शासनाने गायरानातील जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांचे तेथे पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.दहा दिवसांपूर्वी जोरदार झालेल्या पावसाने आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे आळंदी नदीला आलेल्या पुराचा मुंगसरे गावालाफटका बसला. नदीकिनारी असलेल्या शेतकऱ्यांची पिके, शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. त्यातून त्यांना सावरणे कठीण असले तरी अशा आपत्तीचा फटका परत बसू नये व जनतेच्या आर्थिक, शारीरिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी नदीकिनारी असलेल्या कोळीवाडा व इतर वस्तीला गायरानात स्थलांतरित करावे व तेथे अत्यावश्यक सुविधा देत पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासाठी ठराव व गावातील गावकऱ्यांच्या सह्या घेऊन त्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.यावेळी सरपंच कल्पनाताई भोर, उपसरपंच दीक्षिराम फडोळ, पोलीस पाटील बबन म्हैसधुणे, तलाठी प्रतिभा घुगे, शिवाजी भोर, विष्णुपंत म्हैसधुणे, रघुनाथ आंबेकर, सुधाम म्हैसधुणे, साहेबराव चारोसकर, भास्कर म्हैसधुणे, हिरामण नारळे, भाऊसाहेब धुळे, सुवर्णा आंबेकर आदी उपस्थित होते.गावाला आळंदी नदी, रामगंगा, म्हशिध ओहोळ आदी नाल्यांचे पाणी गावातून वाहत जाऊन नदीला मिळत असल्याने प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम गावातील घरांमध्ये पाणी शिरले. नदीकाठी गाव असल्याने ते स्थलांतरित होणे आवश्यक आहे. याबाबत निवेदने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देणार आहोत, तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.- विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी कार्याध्यक्षपुरामुळे गावातील सर्व लोके दोन दिवस मंदिरात आसरा घेऊन होते. त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा यासाठी गावामधील गायरानातील सुमारे दीडशे एकर जमिनीवर नदीकाठावरील लोकांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी गावाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. - कल्पनाताई भोर, सरपंच
पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:06 AM