पेठ : नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेवक तुळसाबाई फोदार यांच्याविरुद्ध दाखल तिसऱ्या अपत्याबाबतच्या अपील अर्जावर नुकताच अपर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला असून, अपीलकर्त्याचे अपील फेटाळण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध खोटी माहिती दिल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ मधून तुळसाबाई फोदार व भारती दुर्गेश मांडोळे यांच्यात लढत झाली. यात फोदार यांचा विजय झाला. त्यानंतर भारती मांडोळे यांनी तुळसाबाई फोदार यांना तीन अपत्ये असल्याचे अपील अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे दाखल करून अपात्र ठरविण्याची मागणी केली. त्यावर अपीलकर्त्यांनी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचे सिद्ध झाल्याने नगरसेवक तुळसाबाई फोदार यांचे नगरसेवकपद यापुढील काळासाठी कायम राहिले. मात्र खोटे पुरावे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून अपीलकर्त्यावर सात दिवसांच्या आत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी पेठ यांना देण्यात आले आहेत. अर्जदार मांडाळे यांच्या वतीने अॅड. विद्येश नाशिककर, तर तुळसाबाई फोदार यांच्या वतीने अॅड. एस. एन. सोनवणे यांनी युक्तिवाद केला. (वार्ताहर)
अपील फेटाळल्याने नगरसेवकपद कायम
By admin | Published: October 20, 2016 12:30 AM