नाशिक : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर लाचप्रकरणात निलंबित झाल्यानंतर त्यांच्या जागेवर प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांची नियुक्ती झाली असली तरी त्या या पदावर काम करण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून जिल्हा परिषदेत लाचलुचपत विभागाकडून माध्यमिक शिक्षण विभागाकडून करडी नजर असल्याने या पदावर कोणही अधिकाऱ्यांची नकारघंटाच असल्याचे दिसून येत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरच रिक्त झालेल्या पदावर तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता झनकरी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने या पदावर कोण अधिकारी येणार असा प्रश्न निर्माण झालेला असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे हा पदभार जाण्याची शक्यता व्यक्त होती. परंतु, राजीव म्हसकर हे देखील वैद्यकीय कारणामुळे रजेवर आहेत तर प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या पुष्पा पाटीलही शिक्षण उपसंचालक कार्यालयातूनच कामकाज करत असल्याने जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग पूर्णत: वाऱ्यावर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या पदावर कोण अधिकारी नियुक्त होणार याकडे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इन्फो-
कळवण तालुक्यातील शिक्षण संस्थेला २० टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. वैशाली झनकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर झनकर यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या पदभार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. परंतु, त्यांनीही हा कार्यभार सांभाळणे शक्य नसल्याचे शिक्षण उपसंचालकांना कळविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.