नाशिक : ‘घर कौलारू’, ‘उंच माझा झोका’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ अशी घराचे नाना पैलू मांडणारी मराठी-हिंदी गाणी... ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर व अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्याशी गप्पांतून उलगडलेले त्यांचे घर... अन् आपल्या स्वप्नातल्या घरात हरवलेले रसिक... अशा भारलेल्या वातावरणात ‘होम स्वीट होम’ मैफल रंगली.मैत्रेयी उद्योगसमूहाच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त मैत्रेय प्रकाशन व मिती क्रिएशन्सच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी आपल्या घराविषयी संवाद साधताना अनुपमा उजगरे यांची कविता वाचून दाखवली. आपल्या घरात सतत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो हे सांगतानाच त्यांनी ‘माझिया दारात’, ‘दारा बांधता’ व ‘उंच माझा झोका’ ही गीते सादर केली. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही घराविषयी उपस्थितांशी संवाद साधला. आनंदी जोशी व धवल चांदवडकर या गायकांनी ‘होम स्वीट होम’, ‘घर कौलारू’, ‘गोरी तेरा गॉँव बडा’, ‘ये तेरा घर’, ‘दिस जातील’ अशी एकाहून एक सरस गाणी सादर करीत रसिकांची दाद घेतली. गप्पा-गोष्टी-गाण्यांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.प्रारंभी प्रमुख मान्यवरांसह ‘मैत्रेयी’च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक वर्षा सत्पाळकर, विजय तावरे, पंकज श्रीवास्तव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कै. मधुसूदन सत्पाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘देह मंदिर चित्त मंदिर’ प्रार्थनेचे गायन झाले. ‘मैत्रेयी’च्या संपादक जयश्री देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात घरासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी उमेश भावसार यांनी, गृहकर्जाविषयी विवेक कौर, तर वास्तुरचनेविषयी अभिजित उपाध्याय यांनी माहिती दिली. उत्तरा मोने यांनी निवेदन केले. अनुजा मिस्त्री यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
गाणी-गप्पांतून उलगडले ‘घरा’शी नाते
By admin | Published: December 22, 2014 12:56 AM