नाशिक : पोटदुखीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका युवकाला शुक्रवारी (दि.८) सीबीएसजवळील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अरुण गोपाळ कंक या रुग्णाचा (३६, रा. गणेशवाडी) सोमवारी (दि.११) मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी अरुणचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तो ज्या दुकानात कामाला होता, त्या मालकाकडून झालेल्या मारहाणीमुळे दगावल्याचा आरोप करत त्यास अटक करण्याची मागणीसाठी रुग्णालयात ठिय्या दिल्याने गोंधळ उडाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला व उपआयुक्त अमोल तांबे यांनी मध्यस्थी करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कंक नामक व्यक्तीचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईक व मित्र परिवाराने घेतल्याने एकच गोंधळ उडाला. जोपर्यंत त्या दुकानमालकाला अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत नातेवाईक आक्रमक झाले. त्यामुळे घटनास्थळी पोहचलेले सहायक आयुक्त प्रदीप जाधव, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी नातेवाइकांची समजूत काढत शवविच्छेदन अहवालात काही आक्षेपार्ह बाब समोर आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन तांबे यांनी संतप्त नातेवाइकांना दिले. त्यामुळे गोंधळ थांबला आणि नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. कंक यांचा ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. त्यावरून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यास मदत होणार आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
रुग्ण दगावल्याने नातेवाइकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:24 AM