नाशिक : लॉकडाऊननंतर नाशिक शहरात बाजारपठमध्ये दुकाने उघडण्यास संदर्भातील नियम शिथिल करण्यात आले असले तरी यासाठी सम आणि विषम पद्धतीनेच दुकान उघडण्याची अट अनेक व्यवसायिकांना मारक ठरते आहे. विशेषत: कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि त्रंबकरोडसारख्या रुंद रस्त्यांवर मेन रोडवरील दुकानांप्रमाण गर्दी होत नसताना याठिकाणीही हाच नियम लागू करण्यात आल्याने व्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात कॉलेज रोड परिसरातील व्यवसायिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे.लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच ते पावणेतीन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहेत. महापालिकेने अधिकृतरित्या गेल्या शनिवारपासून बाजारपेठा उघडण्यास मान्यता दिली असली तरी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षिततेचा भाग म्हणून बाजारपेठेतील दुकाने सम आणि विषम पद्धतीने उघडवीत अशी अट घातली आहे. मेन रोडवर त्यासाठी पी वन पी टू अशी आखणी करून देण्यात आली आहे. मात्र मेनरोड सारख्या ठिकाणी जरी अशा प्रकारचा नियम आवश्यक असला तरी सर्व भागात तो लागू करणे अयोग्य ठरत आहे. शहरातील कॉलेज रोड आणि गंगापूर रोड हे दोन महत्त्वाचे रस्ते रुं द असून स्त्याच्या मधोमध दुभाजकही आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर दुकानांमध्ये येणारा ग्राहक आपली वाहने पार्क करून व्यवस्थित रित्या खरेदी करू शकत असल्याने मेनरोड प्रमाणे गर्दी होत नाही. एरवी सर्व सणावाराच्या काळातही या दुकानांमध्ये मेन रोड सारखी गर्दी कधीच नसते. सध्या तर अडीच ते पावणेतीन महिन्यानंतर दुकाने सुरू झाली असल्याने अद्याप ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसादही मिळालेला नाही. त्यामुळे दुकाने सुरू करूनही अत्यंत कमी ग्राहक दुकानांमध्ये येत आहे. मात्र, त्यातही या मार्गांवरील दुकानांना सम आणि विषम पद्धतीच्या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानांना मनपाचे कर्मचारी दुकाने बंद करीत आहेत. त्यामुळे रुंद रस्त्यांवरील बाजारपेठांबाबत वेगळा निर्णय घ्यावा आणि दुकाने दररोज खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कॉलेजरोड परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे. या परिसरातील दुकानांना वेळेचे निर्बंध घातले तरी हरकत नाही. मात्र दररोज दुकाने खुली ठेवण्यास मान्यता दिल्यास अधिक गर्दी होणार नाही, असे या भागातील व्यवसायिकांचे मत आहे.यासंदर्भात व्यवसायिकांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदनही दिले आहे.
कॉलेजरोडवर सम विषमचे निर्बंध शिथिल करा ; व्यावसायिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 4:47 PM
सम आणि विषम पद्धतीनेच दुकान उघडण्याची अट अनेक व्यवसायिकांना मारक ठरते आहे. विशेषत: कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि त्रंबकरोडसारख्या रुंद रस्त्यांवर मेन रोडवरील दुकानांप्रमाण गर्दी होत नसताना याठिकाणीही हाच नियम लागू करण्यात आल्याने व्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देकॉलेजरोडच्या व्यावसायिकांची नाराजी सम विषम चे निर्बंध शिथिल करण्याची मागणी