कळवण - सुरगाण्यातील सिंचनासाठी वनविभागाच्या अटी शिथिल करा, पश्चिम घाट परिसंवेदनशीलमधून कळवण, सुरगाणा वगळा, पारंपरिक वननिवासी यांच्या अडीअडचणीची सोडवणूक करा, कळवण, सुरगाण्यात औद्योगिक वसाहत स्थापन करा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करा यासह पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढा, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार नितीन पवार यांनी एका कार्यक्रमात घातले. आमदार पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी वार्तालाप करताना मतदार संघातील समस्याचे निवेदन देऊन पाणी, रस्ते, सिंचन, पर्यटन, वन, आरोग्य, वीज सुविधासाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढा अशी विनंती केली. कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांमध्ये व सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धन व त्याप्रमाणात पद निर्मिती करावी, हतगड,चणकापूर व अर्जुनसागर (पुनद) प्रकल्प भागात पर्यटन विकासाला चालना देऊन सापुताराच्या धर्तीवर परिसर विकसित करावा. सप्तशृंगगड ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास कामासाठी निधीची तरतूद करावी, कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचीही मागणी केली.
सुरगाण्यातील सिंचनासाठी वनविभागाच्या अटी शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:27 AM