सिन्नर : कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. कडवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना युवा नेते राजेश गडाख, पंचाळे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी निवेदन दिले.
तालुक्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस आहे. विशेषत: पूर्व भागातील शेतकरी बांधव ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीतून जात आहे. उभी असलेली पिके पुरेशा पावसाअभावी सुकून जात आहे. बहुतांश शेतकरी पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून असल्याने पाण्याची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या कडवा कालव्याला आवर्तन सुटण्याची शेतकरी वाट बघत आहेत. कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. तरी देखील कालव्याला आवर्तन सोडले जात नसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कडवा कालव्याला तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो ओळी: कडवा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याच्या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना देताना युवा नेते राजेश गडाख, महेश थोरात. (१० कडवा)