यंदा निम्मा पावसाळा संपला तरी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने खरीप पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्याही भेडसावण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कडवा धरण ८० टक्क्यांहून अधिक भरले आहे. मात्र आता या परिसरातही पावसाने ओढ दिली आहे. पुढेही पावसाळा असाच कोरडा गेल्यास आवर्तनांचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाची दमछाक होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने धरणातील आवर्तन सोडण्याचे अधिकार जलसंपदामंत्र्यांच्या ताब्यात गेले आहेत.
सिन्नर तालुक्यातील खरीप पिकांची पाण्याअभावी दैना होत असून लवकरात लवकर कडवास आवर्तन सोडावे व त्यासाठी जलसंपदामंत्र्यांकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावा, अशी मागणी आमदार कोकाटे यांनी अभियंता अहिरराव यांच्याकडे केल्याने तसा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता मिलिंद बागुल उपस्थित होते.
इन्फो
पिके वाचवण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
खरीप पिकांना किमान एक आवर्तन मिळाल्यास ते तग धरतील. त्यामुळे शेतक-यांना संकटातून वाचवायचे असेल तर आवर्तन सोडावे लागणार आहे. पाऊस न झाल्यास रब्बीची पिकेही घेता येणार नाहीत. किमान खरिपाची तरी पिके वाचवावी, यासाठी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही आवर्तनाची आमदार कोकाटे यांनी मागणी केली. पालकमंत्र्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
इन्फो
‘आवर्तन कालावधी वाढवून द्यावा
कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी १२ दिवसांचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याची माहिती कोकाटे यांना दिली. एवढ्या कमी दिवसांत शेतक-यांपर्यंत पाणी पोहोचणार नसल्याने आवर्तनाचा कालावधी वाढवावा लागेल, अशा सूचना कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, पाण्यासाठीची मागणी प्रत्यक्ष दिसण्यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी ७ नंबरचे फॉर्म भरून पाणी मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
फोटो -१८ कडवा डॅम
पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याकडे कडवाच्या आवर्तनाबाबत चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे.
180821\18nsk_26_18082021_13.jpg
फोटो -१८ कडवा डॅम