नाशिक : रेषा शिक्षण संस्थेच्या रेषोत्सव या वार्षिक कार्यक्र मात सुमती पवार लिखित आणि संगीतकार, गायक संजय गिते यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमतीची गाणी या अल्बमचे प्रकाशन झाले. हे प्रकाशन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, संजय गिते, मिलिंद कुलकर्णी, सुमती पवार, डॉक्टर विजय घाडगे, वर्षा फेगडे, अनिल भालेराव, कुसुम बुरकुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .याप्रसंगी सुमती पवार यांनी आपले मनोगत मांडले. त्यात त्या म्हणाल्या, इतकी वर्ष मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य केले. एकीकडे मराठी विषय शिकवत असताना माझे कवितालेखन हे बहरत गेले आणि अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले. आज हा कवितांचा संगीतमय संग्रह सीडीच्या रूपाने प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे. त्यानंतर, या आॅडिओ अल्बमचे संगीतकार-गायक संजय गिते यांनी अनेक प्रकारची अल्बममधली गाणी गाऊन दाखवली. अवतीभवती डोंगर झाडी, पतंग दादा पतंग दादा, तरू कळवळला अशी विविध वृत्तातील गाणी सादर केली. नीलिमा पवार यांनी गाण्यांच्या अल्बमला शुभेच्छा दिल्या. तसेच रेषा शिक्षण संस्थेच्या उत्कृष्ट आई, बाबा, पालक अशा उपक्र मांचे कौतुक केले.या अल्बममधील गाणी आसावरी खांडेकर, आज्ञा तुपलोंढे, आर्या कापुरे, संपदा प्रयाग, हर्षली पाटील आणि श्रावणी गिते यांच्या स्वरातील ही गाणी रेषा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सादर केली. कार्यक्र मात यानिमित्ताने उत्कृष्ट आई व उत्कृष्ट बाबा असे उत्कृष्ट पालकांचे पुरस्कारदेखील या समारंभामध्ये देण्यात आले.मराठीची गोडी लागलीयावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी मी सुमती पवार यांची विद्यार्थिनी असून त्यांच्यामुळेच मला मराठी भाषेची गोडी निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे सर्वच विद्यार्थी मराठी भाषेवर अधिक प्रेम करू लागल्याचेही त्यांनी नमूद केले. या अल्बममुळे आपली मराठी कविता, मराठी भाषा घरोघरी पोहोचण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
‘रेषोत्सव’च्या सोहळ्यात ‘सुमतीची गाणी’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:20 PM