सटाणा : वार शुक्रवार, वेळ दुपारी १२ वाजेची़़़ एक आई आपल्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात येते. मुलीला शिकवणी केंद्राजवळ सोडत असतानाच रणरणत्या उन्हात अचानक दहा - अकरा वर्षांची बालिका त्यांच्याकडे येऊन जोरजोरात रडू लागते. माझी मावशी आई मला खूप मारते. आजही मला खूप मारलं म्हणून तुम्ही मला मालेगावला माझ्या आईकडे सोडून द्या म्हणून विनवणी करते. लहान मुलगी प्रचंड भीतीने जोरजोरात रडत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकही जमा होतात अन् त्या बालिकेला सटाणा पोलीस ठाण्यात आणले जाते. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटीलही त्या बालिकेला जवळ घेऊन विश्वासात घेतात. सटाणा येथील नारी सहाय्यता केंद्राच्या अॅड. सरोज चंद्रात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा महिला बालविकास विभाग वन स्टोप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य श्याम बगडाणे यांनाही घटनेची माहिती मिळाल्याने ते पोलीस ठाण्यात धाव घेतात. त्यानंतर समोर आले भयानक सत्य़ पूनम राजेंद्र पवार (१०) या बालिकेच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने सटाणा येथील सावत्र आईकडे पूनम राहते. मात्र सावत्र आईकडून नेहमी बेदम मारहाण होत असल्याने शुक्रवारी सकाळी पूनम घरातून पळून आली. चार फाटा परिसरात उभ्या असलेल्या महिलेला तिने रडत रडत आपबीती सांगितली़ त्या महिलेने आजूबाजूच्या नागरिकांना ही गंभीर घटना सांगितली़ पूनमला सटाणा पोलिसांच्या हवाली केले. भेदरलेल्या बालिकेला पोलिसांनी मायेने विश्वासात घेतले. पोलीस निरीक्षक पाटील व सहकाऱ्यांनी तिला खाऊ देऊन पत्ता विचारला. मात्र तिचा अश्रूंचा बांध फुटल्याने पोलीसही चक्रावले. अखेर ती सावत्र आईचे घर फक्त गाडीतून दाखविण्यास कशीबशी तयार झाली. अॅड. सरोज चंद्रात्रे, हवालदार कैलास खैरनार तिला गाडीत बसवून घेऊन गेले. तिने सावत्र आईचे घर दाखविले़ पोलीस तिचे वडील राजेंद्र पवार व सावत्र आईला घेऊन आले. मला माझ्या मालेगावच्या आईकडेच जायचे. ते मला घरी परत मारतील म्हणून बालिका रडू लागते. राजेंद्र पवार याने सांगितलेल्या तिच्या आईच्या मालेगाव येथील घरी छावणी पोलिसांना पाठविण्यात आले. अखेर रात्री उशिरा पूनमची खरी आई सटाणा पोलीस ठाण्यात आल्यावर पूनम आपल्या आईकडे धावली. दोघा मायलेकींचा अश्रूंचा बांध फुटला. कायदेशीर सोपस्कार पार पाडून पूनमला आईच्या ताब्यात देण्यात आले.
सावत्र आईच्या जाचातून पीडित बालिकेची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:26 AM