लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून पाणी सोडल्याने कादवा काठच्या गावांची पाणीटंचाई दूर सारणार असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे.अनेक दिवसांपासून कादवा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे जनावरांचा व पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती. नदी काठी असणाऱ्या विविध गावातील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठला होता. त्यामुळे काही गावामध्ये दिवसाआड किंवा दोन दिवसांनी पाणी सोडले जात होते. विशेष म्हणजे सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेमध्ये भीतीचे वातावरण असून, हात धुण्यासाठी किंवा बाहेरून आल्यानंतर आंघोळीसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच या गोष्टीमुळे पाणी वापराचे गणित बºयाच गावाचे चुकले होते.परंतु आता कादवा नदीला पाणी सोडल्याने कादवा काठच्या गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. करंजवण धरणातून सोडलेले पाणी पालखेड समूहामध्ये जमा होऊन पुढे येवला, मनमाड शहरांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच पालखेड उजव्या डाव्या कालव्यातून शेतीसाठीही पाणी सोडले जाते. त्याचप्रमाणे पालखेड धरणातूनही अनेक गावांचे पाणी आरक्षित असल्यामुळे त्यांना पाणी सोडावे लागते. पालखेड धरणातील पाणीसाठा कमी कमी होत चालल्यामुळे करंजवण धरणातून पालखेड धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालखेड धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती वाघाड कालवा उपअभियंता देवरे यांनी दिली.
करंजवण धरणातून पाणी सोडल्याने गावांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:05 PM