नाशिक : महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या नावाखाली जुनी मंदिरे, दर्गा यांच्या भिंतींनाही नोटिसा लावल्या असून, न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून पालिकेने चुकीच्या पद्धतीने फेरसर्वेक्षण केल्याचा आरोप मठ-मंदिर बचाव समितीसह सर्वधर्मीय संघटनांच्या प्रतिनिधींकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षण व मोहिमेच्या निषेधार्थ समितीने बुधवारी (दि. ८) नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही दर्ग्यांचा व मंदिरांचा समावेश आहे. या मोहिमेला बुधवारपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याने मोहिमेच्या पूर्वसंध्येला हिंदू-मुस्लीम धार्मिक संघटनांच्या पदाधिका-यांनी जुने नाशिकमधील भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिराजवळ पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा तीव्र निषेध नोंदविला. शहरातील लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत संबंधितांना विश्वासात घेणे गरजेचे होते, असे यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तिचरणदास महाराज यांनी सांगितले. महापालिकेने फेरसर्वेक्षण करून तातडीने सदर मोहीम थांबवावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. उच्च न्यायालयाने १९६० किंवा २००९ अशा कुठल्याही प्रकारच्या सालाचा उल्लेख निकालामध्ये केलेला नसताना पालिकेने १९६० नंतरच्या धार्मिक स्थळांवरदेखील हातोडा चालविण्याची मोहीम आखली आहे हे निंदनीय आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाचा निकाल व लोकभावना समजून घ्याव्या आणि पुन्हा फेरसर्वेक्षण करावे, तसेच कुठलीही मुदत न्यायालयाने दिलेली नसताना पालिकेने धार्मिक स्थळांवर लावलेल्या नोटिसांमध्ये ‘डेडलाइन’ नमूद करणे चुकीचे असल्याचे दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास महाराज यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बडी दर्ग्याचे विश्वस्त नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रझा, असलम खान, हनीफ बशीर, नगरसेवक गजानन शेलार, सुनील बागुल, चंदन भास्करे यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. फेरसर्वेक्षण करून धार्मिक स्थळे अधिकृत की अनधिकृत याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तीर्थक्षेत्र ‘नाशिक बंद’ची धार्मिक संघटनांची हाक; अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 7:13 PM
महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही दर्ग्यांचा व मंदिरांचा समावेश आहे.
ठळक मुद्देपालिकेने १९६० नंतरच्या धार्मिक स्थळांवरदेखील हातोडा चालविण्याची मोहीम आखली आहे हे निंदनीय धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षण व मोहिमेच्या निषेधार्थ समितीने बुधवारी 'नाशिक बंद'चे आवाहन