लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून, शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू असल्याने अनेक कुटुंबे परिवारासह सहलीसाठी ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपणारे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकला पसंती देत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असून, यंदाही इतर स्थळांसह धार्मिकस्थळांकडे पर्यटकांचा ओघ आहे. गेल्या वर्षात येथील पर्यटन व्यवसायासाठी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर्षीही तपमानाचा पारा उंचावल्याने निसर्ग पर्यटन व गडकिल्ल्यांना पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. गतपावसाळ्यात सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसाने नाशिककडे पर्यटकांचा पुन्हा कल वाढू लागला असला तरी नाशिकमध्ये कृषी पर्यटन स्थळे व धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांचेच प्रमाण अधिक आहे. नाशिक जिल्ह्यात टुरिझम, गड- किल्ले, डोंगर-दऱ्या व मोकळा परिसर असे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या ठिकाणी पर्यटक पावसाळा अथवा हिवाळ्यात भेट देण्यास प्राधान्य देतात. तर उन्हाळ्यात येथील त्र्यंबकेश्वरसह गंगा गोदावरी मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर मंदिर, नारोशंकर (रामेश्वर) मंदिर, बालाजी मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, तपोवन, भद्रकाली मंदिर, सोमेश्वर मंदिर, गंगेश्वर वेदमंदिर आदि विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढले आहे. पांडवलेणी, चांभारलेणी, श्री सप्तशृंगी देवी, टाकेद तीर्थ, रामशेज डोंगर, कपिलधारातीर्थ कावनई आदि धार्मिक स्थळी प्रर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे.
धार्मिक पर्यटनाला पसंती
By admin | Published: May 12, 2017 1:58 AM