काही रासायनिक खत कंपन्यांनी मार्च महिन्यात तर काही कंपन्यांनी नुकतीच खतांच्या किमतीत वाढ केली. त्यामुळे ५० किलोच्या एका पिशवीसाठी शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या किमतीपेक्षा निश्चितच ५०० ते ७०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. अगोदरच खतांच्या किमती या खूपच जास्त होत्या. त्या तुलनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निघत नव्हते. आता नव्याने केलेली भरमसाट भाववाढ शेतकऱ्यांवर निश्चितच अन्यायकारक आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दर वाढलेले असताना आता खतांच्या किमती वाढल्याने कोरोनाच्या या संकटात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खतांच्या किमती वाढताच अनेक खासगी कृषी निविष्ठा व्यावसायिक शेतकऱ्यांना दुकानात खतेच शिल्लक नसल्याचे सांगत आहेत. मात्र, अशा अवस्थेत वडांगळी येथील ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे व संचालक शिवाजी खुळे, कैलास खुळे, माधव खुळे, योगेश खुळे, नितीन आडांगळे, मधुकर गीते, सोमनाथ जाधव, विश्राम उगले, मीननाथ कांडेकर, व्यवस्थापक अरुण थोरात यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून जुन्या भावाने घेतलेल्या शिल्लक साठ्यातील सर्व खते जुन्याच भावाने विकून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. १०:२६:२६, १८:४६:००, १२:३२:१६, २४:२४:००, १९:१९:१९, १५:१५:१५ आदी प्रकारची सुमारे ४५ टन रासायनिक खते जुन्याच भावाने विकली. त्यातून शेतकऱ्यांचा सुमारे ६ लाख रुपये फायदा झाला आहे. परिसरात खरिपाची तयारी सुरू असून, खरिपात सोयाबीन, मका ही मुख्ये पिके घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली आहे.
इन्फो
खतांचा प्रकार - जुने दर - नवे दर
इफको
१०:२६:२६ - ११७५ - १७७५
१२:३२:१६ - ११९० - १८००
२०:२०:००- ९७५ - १३५०
१८:४६:०० - ११८५ - १९००
महाधन
१०:२६:२६ - १२७५ - १९२५
२४:२४:०० - १३५० - १९००
२०:२०:०:१३ - १०५० - १६००
कोट...
कंपनी स्थापन केल्याने परिसरातील सर्व खासगी दुकानातील खते व बियाणे यांचे दर कमी झाले. त्यातून शेतकऱ्यांचाच फायदा होत आहे. आताही खतांचा स्टॉक न करता ज्यांच्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी जुन्याच दराने खत विक्री करण्याचा निर्णय घेतला. ३४६ शेतकरी कुटुंबांना ६ लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
- सुदेश खुळे, अध्यक्ष