पंचवटी: गेल्या अनेक दिवसांपासून हिरावाडी परिसरातील पाण्याच्या पाटालगत मृत जनावरांचे अवशेष तसेच मृत जनावरे फेकली जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाटकिनारी मृत जनावरे व जनावरांचे अवशेष पडूनच असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमय वातावरणातूनच ये-जा करावी लागत आहे. हिरावाडी तसेच जवळच्या परिसरात अनेक गायी, म्हशींचे गोठे असून, काही दुग्धव्यावसायिक जनावर मृत झाले की रात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील भिकुसा पेपर मिलच्या लगत असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ आणून टाकतात. या मृत जनावरांचे मांस खाण्यासाठी परिसरातील मोकाट तसेच भटकी कुत्री येथे येतात. या कुत्र्यांचादेखील उपद्रव वाढलेला आहे. रस्त्याने ये-जा करताना ही मोकाट कुत्री अंगावर भुंकत असल्याने तसेच दुचाकी वाहनांच्या मागे लागत असल्याने वाहनधारक वाहनासह पाण्याच्या पाटात पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पाण्याच्या पाटालगत मृत जनावरे फेकली जात असल्याने महापालिकेच्या संबंधित विभागाने मृत जनावरे फेकणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी हिरावाडी परिसरात राहणाºया रहिवाशांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मृत जनावरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हिरावाडी पाटकिनारी मृत जनावरांचे अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:35 AM